सिंधुताई सपकाळ यांचं निधन, महाराष्ट्रावर शोककळा; पंतप्रधान. मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली.
सिंधुताई यांच्या जाण्यानं हजारो त्यांची हजारो लेकरं पोरकी झाली. अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय, सामाजिक, कला आदी क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker), हजारो लेकरांची माय (Mother of Orphans) आणि जवळपास अडीच हजार जावई लाभलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं आज दु:खद निधन झालं. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला . सिंधुताई यांच्या जाण्यानं हजारो त्यांची हजारो लेकरं पोरकी झाली. अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय, सामाजिक, कला आदी क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सिंधुताई समाजसेवेसाठी स्मरणात राहतील- पंतप्रधान मोदी
सिंधुताई सपकाळ या त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी कायम स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नामुळे अनं अनाथ मुलं चांगलं जीवन जगू शकली. त्यांनी उपक्षेत समाजासाठी मोठं काम केलं आहे. त्यांच्या निधनामुळे दु:ख झालं. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती, असं ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती- मुख्यमंत्री
सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.
दीड वर्षांपूर्वी सिंधूताईनी स्वतः आपल्याशी दूरध्वनीवर बोलून विचारपूस केली होती आणि कोविडच्या लढ्यासाठी बळ दिलं होतं याची आठवण काढून मुख्यमंत्री म्हणतात की, महाराष्ट्राची मदर तेरेसा असं त्यांना संबोधलं जायचं ते अगदी बरोबर होतं. दुःख कुरवाळत बसू नका तर पुढे चालत रहा हे त्यांच्या जीवनाचं तत्व होतं. इतक्या खस्ता त्यांनी खाल्ल्या, कष्ट उपसले, समाजाकडून कायम दुस्वास होत होता, पण माईंनी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मिटू दिलं नाही. पद्मश्री सारखा महत्वाचा पुरस्कार मिळूनही त्या आपल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या होत्या की मला अजूनही अनेकांपर्यंत पोहचून त्यांना घास भरावयाचे आहेत. साधी राहणी, उच्च विचारसरणी याचे यापेक्षा काय उदाहरण असेल? त्या सदैव अनाथ, निराधारांच्या कल्याणाचा विचार करत असत. स्वतःच्या जीवनात आलेला दुःखाला बाजूला सारून त्यांनी अनेकांना आधार दिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा डोंगर उभा केला. या कामामुळेच अनेक मुली, महिला, निराधारांना आयुष्यात मायेची सावली मिळाली.
त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाजजीवनात आपल्या कामाने आदर्श निर्माण करणारी, अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
असंख्य लेकरे पोरकी झाली – राज्यपाल
‘सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला – मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले. वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य लेकरे पोरकी झाली आहेत. या महान मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो व त्यांच्या सर्व लेकरांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो, ही प्रार्थना करतो’, अशा शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
0 Response to " सिंधुताई सपकाळ यांचं निधन..."
टिप्पणी पोस्ट करा